भटका विमुक्त दिवस वैनगंगा विद्यालयात उत्साहात साजरा

भटका विमुक्त दिवस वैनगंगा विद्यालयात उत्साहात साजरा
पवनी : स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात दि. ३१ ऑगस्ट रोजी भटक्या विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य अजय ठवरे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रमोद मेश्राम व पर्यवेक्षक विकास रीनके ज्येष्ठ शिक्षक अविनाश नरहरशेट्टीवार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक उमेश पवार यांनी या समाजाची ऐतिहासिक व सामाजिक स्थिती स्पष्ट करत शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती कशी साधता येईल हे विवेचन केले.
याप्रसंगी प्राचार्य अजय ठवरे यांनी भटक्या विमुक्त समाजातील लोकांच्या विविध समस्या व त्यावरील उपाययोजना यावर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उमेश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रोफेसर आकरे यांनी केले. यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
