वैनगंगा विद्यालयात गुणवंतांचा पालकांसह भव्य सत्कार


पवनी : स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात व वैनगंगा पब्लिक जूनियर कॉलेज इयत्ता 12 वी व 10 वीच्या गुणवंत तसेच प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार सोहळा 15 मे रोजी विद्यालयाच्या अटल लॅबमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वागत समारंभ पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अजय ठवरे यांनी केले. त्यांनी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची माहिती देत विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि पालकांच्या सहकार्याचे कौतुक केले.
इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत 92 विद्यार्थ्यांपैकी 90 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 96.77 टक्के लागला. कला शाखेत 56 पैकी 46 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन 82.14 टक्के निकाल नोंदविण्यात आला. तसेच इयत्ता 10 वीमध्ये 224 पैकी 217 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एकूण निकाल 94.13 टक्के लागला.
यामध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावण्याचा मान विद्यार्थिनी श्रावणी राजेंद्र ठोंगसे हिने मिळविला. तसेच 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे तब्बल 18 विद्यार्थी यशस्वी ठरले.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, संचालिका भावना तर्वेकर, सचिव विनोद मेंढे, प्राचार्य अजय ठवरे, उपप्राचार्य प्रमोद मेश्राम, पर्यवेक्षक विकास रिनके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्राध्यापक संदीप समर्थ यांनी अकरावी प्रवेशासंबंधी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर सचिव विनोद मेंढे यांनी विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात सेवा देत समाजासाठी कार्य करावे, असे मार्गदर्शन केले. तसेच वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून प्रगती साधावी, गरुडासारखी उंच झेप घ्यावी आणि यश संपादनासाठी स्वयंभू आत्मविश्वास जपावा, असा मोलाचा सल्ला दिला.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांच्या पाठबळाला दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. आकरे यांनी केले, तर संचालन सीमा गंडाते व प्रज्ञा बंसोड यांनी केले. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे सर्वत्र कौतुक होत आहे.







