प्रियदर्शनी गणेश उत्सव मंडळाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांकक्रमांक
सामाजिक प्रबोधनासह पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची दखल

- प्रियदर्शनी गणेश उत्सव मंडळाचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
ū
पवनी : वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था, विश्व हिंदू परिषद, भंडारा जिल्हा आणि दैनिक देशोन्नती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा-२०२६ मध्ये पवनी येथील प्रियदर्शनी गणेश उत्सव मंडळ (महाराजा पवनीचा), गणेश वॉर्ड यांची भंडारा जिल्ह्यात प्रथम क्रमांकासाठी निवड झाली. जिल्ह्यातील २५१ गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विजेत्या मंडळाला ३१ हजार रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
प्रियदर्शनी गणेश उत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण, जलसंवर्धन, ऐतिहासिक वारसा जतन आणि जनजागृतीपर विविध उपक्रम राबविले. पर्यावरणपूरक मातीची गणेशमूर्ती आणि ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनावर आधारित केदारेश्वर मंदिराची आकर्षक प्रतिकृती हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, महिलांवरील अत्याचार आणि ॲसिड हल्ले यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्यात आली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांसह ऑलिम्पिकमधील महिला खेळाडूंच्या योगदानाची माहिती चित्ररूपातून मांडण्यात आली.
जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पाणलोट क्षेत्र, शेततळी आणि पावसाच्या पाण्याची साठवण यावर आधारित प्रदर्शनी साकारण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी, रक्तदान, वृक्षारोपण तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
अंधश्रद्धा निर्मूलनावर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. तसेच निराधार व श्रावणबाळ योजनेबाबत मार्गदर्शन, स्त्रीभ्रूणहत्येविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ऐतिहासिक वास्तू व राष्ट्रीय स्मारकांची स्वच्छता असे उपक्रम राबविण्यात आले. सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना सरबत वाटप करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. उपाध्यक्ष पितांबर भोगे, सचिव प्रशांत भोगे, सहसचिव प्रवीण रायपूरकर, कोषाध्यक्ष भूपेश रायपूरकर, उत्सव समिती अध्यक्ष अक्षय बिसने, माजी अध्यक्ष किशोर भोयर यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमासाठी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य तसेच महिला व बाल स्वयंसेवकांनी सहकार्य केले. अशोक रायपूरकर, बबन रायपूरकर, उमाकांत भोगे, महेश बिसने, आवेश रायपूरकर, विशाल भोगे, विशाल मेश्राम, राकेश बिसने, शशिकांत भोगे, उमेश रायपूरकर, सुनील भोगे, रोहित रायपूरकर, धनंजय भोयर, बिरजू रायपूरकर, सरजू रायपूरकर, आशुतोष रायपूरकर, आदेश भोगे, संदेश भोगे, यश भोगे, आकाश बिसने, हिमांशु भोगे, तुषार भोगे, अमोल बेले, प्रिन्स रायपूरकर, दक्ष भोगे, अभय भोगे, तेजस भोगे, चिंटू बिसने, पारस भोगे, ओम भोगे, गुड्डू भोगे, शुभम कोल्हे, आदित्य भोगे, कुणाल बिसने, आर्यन बिसने, देवांशू, वेद, ऋग्वेद, कौशिक, स्मित, रेहांश, आयुष तसेच आभा भोगे, राधा भोगे, खुशी भोगे, मैथिली भोगे, प्रज्ञा भोगे, प्रिथा रायपूरकर आणि गार्गी बिसने यांनी योगदान दिले.
बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार सुनील मेंढे होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, पवनीच्या नगराध्यक्ष सौ. विजयाताई नंदुरकर, विदर्भ प्रांताचे संयुक्त प्रांत मंत्री देवेश मिश्रा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वसंत ऐंचिलवार, साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापगते, वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोमदत्त ब्रह्मानंद करंजेकर आणि दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम उपस्थित होते.
धार्मिक उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देत राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे प्रियदर्शनी गणेश उत्सव मंडळाने जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.




ū


