
- उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत श्रेयशी चव्हाणचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
NMMS नंतर पुन्हा एकदा वैनगंगा विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी
पवनी : वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पवनी येथील इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी श्रेयशी विवेक चव्हाण हिने उत्तुंगतेज यंग सायंटिस्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम – २०२६ अर्थात उत्तुंगतेज बालवैज्ञानिक शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा मध्ये भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
विशेष म्हणजे श्रेयशीने यापूर्वीही NMMS परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आपली बुद्धिमत्ता आणि अभ्यासातील सातत्य सिद्ध केले होते. आता पुन्हा एकदा उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत अव्वल स्थान मिळवत तिने पवनी शहरासह संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धा परीक्षेच्या पुढील टप्प्यातील मुलाखतीसाठी तिची निवड झाली असून, तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
उत्तुंगतेज बालवैज्ञानिक शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना ₹10,000 शिष्यवृत्ती, पाच दिवसीय वैज्ञानिक अभ्यास दौरा, बाल वैज्ञानिक पुरस्कार, प्रमाणपत्र व मेडल, तसेच इस्रोच्या वैज्ञानिकांकडून विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणारी ठरते.
श्रेयशीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव विनोद मेंढे, संचालिका भावना तर्वेकर, प्राचार्य अजय ठवरे, उपप्राचार्य प्रमोद मेश्राम, पर्यवेक्षक विकास रिनके, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रेयशीच्या या यशामुळे वैनगंगा विद्यालयासह पवनी परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.







