ईतर

वैनगंगा विद्यालयाची भक्तिमय पालखी दिंडी

विदर्भाच्या काशीत अवतरली पंढरी

youtube

पवनी (तालुका प्रतिनिधी): आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पवनी येथील वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांची पारंपरिक पालखी दिंडी उत्साहात पार पडली. कपाळी चंदनाचा टिळा, हातात टाळ-मृदुंग, मुखी “जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल”चा अखंड गजर आणि संतांच्या अभंगांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. चिमुकल्यांच्या या भक्तिरसपूर्ण दिंडीमुळे विदर्भाच्या काशीत जणू पंढरीच अवतरल्याचा अनुभव नागरिकांना आला.

या दिंडीत विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव विनोद मेंढे, संचालिका भावना तर्वेकर, प्राचार्य अजय ठवरे, उपप्राचार्य प्रमोद मेश्राम, पर्यवेक्षक विकास रिनके तसेच ज्येष्ठ शिक्षक अविनाश नरहरशेट्टीवार यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली.

त्यानंतर पालखी दिंडी शहरातील प्रमुख मार्गांवरून पारंपरिक पद्धतीने मार्गक्रमण करू लागली. दिंडीत भगवान विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ आदी संतांची आकर्षक वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थिनींनी मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन सहभागी होत वृक्षसंवर्धनाचा आणि पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला.

टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरेल निनादात विद्यार्थ्यांनी प्रत्येक चौकात रिंगण घालत विठ्ठलनामाचा अखंड जयघोष केला. “जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल”च्या घोषणांनी संपूर्ण शहर भक्तिमय झाले. नागरिकांनीही या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले.

दिंडी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी रिंगण घालत संतांचे अभंग सादर केले. त्यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

दिंडीचा समारोप विद्यालयात भक्तिमय वातावरणात झाला. यावेळी विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापनाने विशेष परिश्रम घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेचे संस्कार, भक्तीभाव, सामाजिक एकात्मता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे रुजविण्यात आला.

ad3
ad2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close