नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
भंगाराम देवी मंदिरात पारंपरिक संस्कृतीचे दर्शन; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पवनी : येथील माँ भंगाराम देवी मंदिर परिसरात तान्हा पोळा उत्सवानिमित्त नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बालगोपाल, पालक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
स्पर्धेत सहभागी बालगोपालांनी आकर्षक पद्धतीने नंदीबैलांची सजावट करून ग्रामीण व कृषी संस्कृतीचे मनोहारी दर्शन घडविले. विविध वेशभूषांमधून बालकलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे शेतकरी बांधवांच्या विविध समस्या मांडणारे देखावेही सादर करण्यात आले. ‘धानाला ३५०० रुपये भाव व बोनस द्यावा’ अशी मागणी करणाऱ्या देखाव्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेतील नमन सिखलवार, अरयु मोटघरे, ईश्वरी हटनागर, ओवी मडावी व क्रीशीव थोटे या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सर्व स्पर्धकांना तोमेश्वर पंचभाई यांच्या वतीने पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या. तसेच अनिल मेंढे, किशोर पंचभाई, विकास सरोदे, रवी जिभकाटे, शरद देवाडे व शेखर पारधी यांच्या वतीने सायकली भेट देण्यात आल्या.
कार्यक्रमाला तोमेश्वर पंचभाई, अनिल मेंढे, किशोर पंचभाई, विकास सरोदे, नगराध्यक्षा डॉ. विजया नंदुरकर, उपाध्यक्ष सोनू बावनकर, सुशीला दीदी, गटनेते सुरेश अवसरे, नगरसेवक भास्कर उरकुडकर, शानू बेग, नगरसेविका सारिका नंदरधने, वर्षा बिलवणे, निकिता मेश्राम, वैष्णवी हटवार, भीमाताई बावनकर, लीलाधर मुंडले, राजूभाई ठक्कर, धर्मेंद्र नंदरधने व डॉ. विजय ठक्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
यावेळी पवनी नगरातील विविध विद्यालये व महाविद्यालयांमध्ये सन २०२५-२६ मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.
नंदीबैल सजावट, वेशभूषा स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या माध्यमातून कृषी परंपरा, ग्रामीण संस्कृती आणि शिक्षणाची प्रेरणा यांचा सुंदर संगम साधण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माँ भंगाराम देवी पंचकमिटी व नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.






